Friday, March 27, 2009

झपाटलेली माणसं - १


मझ्या आयुष्यात काही झपाटलेली माणस आली. या माणसांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात प्रचंड काम केलेल आहे. पण ह्या माणसांना फारशी प्रसिध्दी मिळाली नाही. किंबहूना त्यांनाच ती नको होती. स्वत:च्या क्षेत्रात त्यांनी झपाटल्या सारखे काम केले. त्यांच्या विषयी थोडेसे....

भागवतराव धोंडे

माझ्या कॉलेजमधे जयंत धोंडेचे हे वडिल. माझी जयंतची ओळखी झाली त्याचा एक किस्साच आहे. बोलता बोलता मी बोलून गेलो की डेक्कन वरचे महाराष्ट्र आमचे दुकान आहे. त्याने लगेच सांगितले की अरे माझे वडील तुझ्या वडीलांना ओळखत असतील. कारण ते पुर्वी आमच्या दुकानात हॅंगर विक्रीसाठी द्यायचे. मी घरी येउन माझ्या वडीलांना विचारल. ते म्हणाले "हो मी त्यांना चांगलच ओळखतो. पण आजकाल त्यांच्या क्वॉलिटीचे हॅंगर मिळत नाहीत. "

पुढे जयंत बरोबर त्याच्या घरी जायचा योग आला. जयूनी माझी त्यांच्याशी ओळख करुन दिली. मी महाराष्ट्रवाल्यांचा मुलगा म्हणल्यावर ते एकदम खुश झाले. नम्रता म्हणजे काय असते ते मला त्यांच्या घरी गेल्यावर कळले. हा पारखे परितोषीक मिळालेला माणूस कमालीचा नम्र. त्यांच्या नम्रतेने मला कायम संकोचल्या सारखे व्हायचे. त्यांच्या घरातील सगळीच मंडळी कमालिची नम्र आहेत. जयूची आई, बहिण वर्षा, लहान भाउ हेमंत स्वत: जयू. मला कधी कधी प्रश्न पडायचा की या माणसांना कधी राग येतो की नाही. त्यांना बर्‍या लोकांनी प्रचंड त्रास दिला पण यांना कधी मी रागावलेले बघितले नाही.

राहूरी जवळच्या सडे नावाच्या गावातून हा माणूस पुण्यात आला. शेतकी महाविद्यालयातून बि. एस्सी. झाले. शेतकर्यांसाठी काही संशोधन करावे हा विचार त्यामुळे पिंपरी चिंचवड भागात वर्कशॉप चालू केले. तेव्हा ते हॅंगर बनवत पण ते फक्त चरितार्थासाठी. डोक्यात सतत काहीतरी विचार चालू. मुळचा पिंड संशोधनाचा त्यामूळे ओघानेच व्यवहाराच्या बाजूस अंधार. पण सतत उत्साही. पुढे ते वर्कशॉप काही कारणाने लहान भावावर सोपवून ते नायजेरीयाला गेले. तेथील शेतिचा पसारा मोठा. एक शेत ५००-१००० एकराच. नगर जिल्ह्यातला हा शेतकी पदवी असलेला माणूस ज्याने कधी एवढी शेती बघितली नव्हती. बर तेथे त्रास देणारे काही कमी नव्हते. पण त्यांनी हे आव्हान जिद्दीने पेलले. (त्यांचनायजेरियातील शेतीया नावाच पुस्तक जरुर वाचण्यासारखे आहे) जाताना डोक्यावर कर्जाचा डोगंर होता. तेथे अहोरात्र कष्ट केले. जेवायचे हाल होत. बर हे शाकाहारी त्यामूळे तर अजुन प्रॉब्लेम. पण ते जेव्हा जेव्हा भारतात येत तेव्हा तेव्हा त्यांची कधीही नायजेरियातल्या वास्तव्या बद्दल तक्रार नसायची.

त्यांच्या घरी अनेक जुन्या इंग्रजी सिनेमांच्या व्हिडीओ कॅसेट्स होत्या. तो त्यांचा छंद होता. मी त्याच्याकडे The Longest day, Spartacus, Hatari, Lowrence of Arebia, Beautiful People अशा किती सिनेमांची अक्षरश: पारायण केलेली आहेत.

त्यांच्या घरी गेल की आमच्या मस्त गप्पा होत. ते आमच्याशी बोलताना मित्रासारखे बोलत कारण त्यांच जयूच नात पण मित्रासारख होत. या विषयी जय़ूनी आम्हाला एक किस्सा सांगितला होता. एकदा जयुच्या राहुरीच्या कॉलेजच्या मित्रांनी खोडसाळ पणानी त्याच्या वडिलांना जाउन सांगितले की तुमचा मुलगा चारमिनार ओढतो. तर त्यावर त्यांनी मित्रांना उत्तर काय द्यावे.. ‘मी तर त्याला कॅपस्टनला पैसे देतोअसे त्या दोघांमधे नाते होते. गप्पा मारताना मधेच ते चहा घेणार का? विचारायचे आपण हो म्हणालो की ते खुश होत. मग जयूची आई त्यांना आवडणारा फिका चहा आणून द्यायची. ही गप्पांची मैफिल - तास चालायची. विषय पाणि, माती, उर्जा यासंबधीचे.

पुढे आम्ही पास आउट झाल्यावर जयुने झपाटल्या सारखे कंटुर मार्कर (हा शोध त्यांचाच) विकले. त्यानी फॉरेस्ट खात्यातील कितीतरी जणांना फुकट ट्रेनिंग दिले. संगमनेरच्या येथील डोंगरांवर तुम्हाला दिसणारे समपातळी चर हे जयूने त्यावेळचे फॉरेस्ट खात्याचे ऑफिसर श्री. टाकळकर यांच्या मदतीने उन्हातान्हात हिंडून केले आहेत. ही योजना सर्व महाराष्ट्रात राबवावी अशी त्यांची इच्छा होती. पण या बदल्यात त्यांना सरकार कडून मिळाली पोकळ आश्वासन. एवढे होऊन सुद्धा जयूच्या काय किंवा धोंडे काकांची कोणाबद्द्ल तक्रार नव्हती.

तेवढ्यात त्यांच्यावर एक संकट कोसळले. माझा मित्र जयंतला एके दिवशी अचानक पोटाचा त्रास चालू झाला. त्याला पुना हॉस्पिट्ल मधे ठेवले होते. पहिले काही दिवस काय झालय ते काहीच तपास लागत नव्हता. एक दिवस डॉ. अनिल अवचट आले. (त्यांचा व धोंडे काकांचा चांगलाच घरोबा) त्यांनी तेथील डॉक्टरांना सविस्तर विचारले तेव्हा कळले की जय़ूला पॅनक्रीयाचा काही तरी विकार झाला होता. त्या आजारातून जयू काही उठूच शकला नाही. १५ दिवसांनी हॉस्पिटल मधेच त्याला मृत्यू आला. त्यांच्या परिवारावर जणू कुर्‍हाडच कोसळली.

काही दिवसांनी धोंडे काका त्यातून सावरले. तोपर्यंत वर्षाला मॉडर्न कॉलेजमधे नोकरी लागली. पुढे जयूचा लहान भाऊ हेमंत हा COEP मधुन शिकून बाहेर पडला. नंतर तो स्कॉलरशीपवर अमेरीकेला गेला. आता गाडी रुळावर आली होती तेव्हढ्यात एके दिवशी फोन आला की धोंडे काकांना पॅरॅलिसीसचा स्ट्रोक आला. त्यांना भेटायला दिनानाथ मधे गेलो. ते बेशुध्द्च होते. त्यांना अस असहाय्य पडलेल पहून मला रडूच कोसळले. खरेतर त्यांच्या घरच्यांना धीर द्यायला गेलो होतो. पण या माणसाला अस मी कधी आजारी पडलेल बघितल नव्हत. दुसर्‍या दिवशी हेमंत अमेरिकेवरुन आला. त्याच्या दुसर्‍या दिवशी काका गेले.

काकांच जाण मला चांगलच चटका लाउन गेल. मी बरेचदा जयू गेल्यानंतर सुध्दा त्यांच्या घरी काही निमित्ताने गेलो की तासभर कसा जायचा ते कळायचे नाही.

धोंडेकाकानी आपल्या आयुष्यात प्रचंड त्रास सहन केला, प्रचंड कष्ट केले, मनात कायम विचार संशोधनाचा. त्यांनी आयुष्यभर आपल झपाटलेपण सोडल नाही.

(कालच वर्षाचा - धोंडेकाकांच्या मुलीचा फोन आला होता की जयूच्या मुलीला दहावीत ९५% मार्क पडले. त्यामुळे मला माझ्या अर्धवट राहिलेल्या blog ची आठवण झाली.)


5 comments:

  1. it is not only touching but teaching story.

    Thank you for completing the same

    Nilesh Deshmukh

    ReplyDelete
  2. कौस्तुभ,

    एकदम अप्रतिम !
    अवचटांच्या धोंडे सरांवरच्या लेखाची आठवण झाली.
    २,३,४... वाचायची उत्सुकता आहे आता

    ReplyDelete
  3. कौस्तुभ, मस्तच! मित्राजवळ बोलावं तसं सहज आणि मनापासून लिहीलं आहेस. आणखी लिही.

    ReplyDelete
  4. कौस्तुभ,
    छान ! पुढची झपाटलेली माणसे कोण असतील अशी उत्सुकता वाटते आहे.
    या माणसांचे वेगळेपण कशात आहे,ज्यामुळे ती झपाटली जावू शकली असे तुला वाटते?

    ReplyDelete
  5. विद्या धन्यवाद. मी धोंडेकाकांना जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा तेव्हा आमच्या गप्पा कायम पाणि, माती, कंटुर मार्कींग त्यांनी लावलेले शोध याच्यावर होत असत. हा माणुस सतत विचार करायचा संशोधनाचा. त्यांच्या काही कल्पना तर इतक्या साध्या असायच्या की कधी कधी वाटायच यात काय नविन शोध आहे. पण स्वत: B.Sc. Agriculture असल्याने त्यांना शेतकर्‍यांच्या समस्या माहित होत्या (त्यांच बरचस संशोधन हे शेतकर्‍यांसाठी केलेल आहे) ते त्याला appropriate technology म्हणायचे. मला अस वाटत की हा माणुस फक्त संशोधनानी झपाटला होता. त्यापुढे त्यांनी आर्थीक फसवणूक, लोकांनी दिलेला त्रासही गौण मानला. माझ्या मते असे काम मनुष्य झपाटल्याशिवाय करुच शकत नाही.

    पुढचा झपाटलेली माणसं - २ लिहायला घेतल आहे.

    ReplyDelete